संवादाकरता 

27 07 2023

संवादाकरता 

आम्ही दोघं शोधतोय 

एक निरुपद्रवी विषय ,

जसा एक स्तब्ध जलाशय …

त्याच्या ‘ कलहमुक्त ‘ घोषित केलेल्या 

आपापल्या काठांवर बसून

आम्ही टाकत राहूत 

वापरुन गुळगुळीत झालेल्या 

निरर्थक प्रश्नोत्तरांंचे खडे…

अश्या हुशारीने , की त्यांनी निर्माण केलेल्या तरंगांमुळे

भास होत राहील, प्रवाहीपणाचा !

खरं तर आत कुठेतरी वाटत रहातंच,

की बोलावं झडझडून- 

सारा धीर एकवटून

एकदा भांडावं कडकडून …

वादाकरता –

निदान , त्यात लपलेल्या 

संवादाकरता …

छंद आनंदाचा

27 07 2023

देखिला तो कंद आनंदाचा 

लाभला मज छंद आनंदाचा 

डोळियांच्या ओंजळीने सारा 

प्राशिला मकरंद आनंदाचा 

बासरीची साद रानी जाता 

हेलकावा मंद आनंदाचा 

हासला तो खेळिया जाताना…

भासला आनंद आनंदाचा 

सांडिली भवबंधने जीवाने 

सोहळा स्वच्छंद आनंदाचा !

सुरुवात नव्या दिवसाची

06 11 2010

( कृपया हेही पाहावे :  http://www.manogat.com/diwali/2010/node/5.html )

 

अवचित नौका ऊर्मीची जाणीवकिनारी यावी
हरखून उठावी प्रतिभा, स्वागता समोरी जावी

बघताच तिला प्रतिमांची मोहक तारांबळ व्हावी
शब्दांनी फेर धरावा, छंदाची वसने ल्यावी

लय लोभस एक सुचावी, गोडशी सुरावट गावी
प्रासांचे पैंजण पायी, रचनेने गिरकी घ्यावी

इवल्या प्राजक्तकळ्या ती, ओंजळीत घेउन यावी
वेळावुन मान जराशी, आश्वासक मंद हसावी

सुरुवात नव्या दिवसाची एकदा अशीही व्हावी
हलकेच मला जागवण्या सुंदरशी कविता यावी !

ध्यास आहे

02 05 2010

( कृपया हे ही पहावे :

http://www.maayboli.com/node/15825 )

जीवनाला ध्यास आहे
टाळणे मरणास आहे

(जीवनाला ध्यास आहे
गाठणे मरणास आहे

जीवनाचा ध्यास आहे
रोजचा सहवास आहे)

एकदा अपवाद व्हावे
वाटते नियमास आहे

पाखरे विसरून गेली
खंत ही घरट्यास आहे

एकदा माणूस झालो-
भोगला वनवास आहे

रौद्र ये भवसागराला
धाम पैलतिरास आहे

कोकिळा परतून ये रे,
तिष्ठला मधुमास आहे

लालबुंद टपोर गाली
लाजली तर खास आहे !

सैलशी भरगच्च वेणी-
काय सुंदर फास आहे…

पिंक स्लिप

26 04 2010

कृपया हे ही पहावे :

http://www.manogat.com/node/19593

***************************************

भिंतीवर माझी  ‘ चीफ, एचआरडी ‘ ची पाटी आहे
नावासोबत विदेशी पदव्यांची दाटी आहे
समोर बसलेला, माझ्या दुप्पट वयाचा
इथला सर्वात जुना कर्मचारी विचारतोय,
‘ हे सकाळीच बोलावणं कशासाठी आहे? ‘
….
तो बंद लिफाफा मी मूकपणे त्याला देतो–
कुठल्याच गुलाबी भावनांशी नातं नसणारी
पिंक स्लिप आहे त्यात, जुनी नाती पुसणारी..

मी आवंढा गिळतो,
आणि बरेचसे अवघडलेले शब्दही.
एवढं शिकलो, पण एवढंच शिकलो नाही-
शांतपणे कसं सांगायचं कुणाला,
‘उद्यापासून तुम्ही यायची गरज नाही’ ?

दोन धीराचे शब्द मला सुचायच्या आतच-
त्या दोन ओळी वाचून
तो सावकाश उठतो,
माझी अवस्था पाहून अचानक मोकळं हसतो.
आणि उभं रहायचंही विसरुन गेलेल्या मला
खांद्यावर हलकं थोपटून, निघूनही जातो….

आता केबिनमध्ये माझ्या सोबतीला
एक नवंच कोडं मुक्कामाला आलंय-
आज इथे
नक्की कुणी कुणाला मुक्त केलंय ?

गर्दीतले

20 03 2010

( http://www.manogat.com/node/19260 )

रोज आहे एकट्याने चालणे – गर्दीतले
एकट्याने चालताना – भासणॅ गर्दीतले

काय आहे बेट हे माणूस नावाचे तरी !
साधले बेट्यास आहे वाहणे गर्दीतले..

एकमेकां खेटताना, झोंबताना सोसतो-
अंतरीच्या अंतरांचे वाढणे गर्दीतले

पुण्य गाठी बांधणे आहे तसे सोपे इथे
मंदिराशी फक्त थोडे वाकणे गर्दीतले

व्यर्थ आहे धावणे, नादावणे -जाणूनही
रोज माझेही स्वतःला धाडणे गर्दीतले

आजही ओलावल्या डोळ्यांत होते साजरे-
माणसाला माणसाचे लाभणे गर्दीतले

संपले ते युद्ध नाही, थांबले ना प्रत्यही-
मानवाचे माधवाला शोधणे गर्दीतले

कधी कधी

27 02 2010

अशीच ती खुळ्यासमान वागते कधी कधी
अजूनही मला बघून- लाजते कधी कधी

नभात मेघ दाटता मनातल्या खणातले-
खट्याळ मोरपीस ते खुणावते कधी कधी

जुन्या वहीतली तुझी फुले कधीच वाळली
कुणी चुकार पाकळी उसासते कधी कधी..

दुपार शोधते जरा निवांत कोपरा कुठे-
बघून गर्द सावली विसावते कधी कधी

कधी-कसे-किती-कुठे..जरी तिचेच कायदे ,
न राहवून तीच खोड काढते कधी कधी !

तिला नको असेल काव्य- ऐकवू विनोदही
उनाड पोरही नशीब काढते कधी कधी !

तुझ्या कथेशिवायही नवे लिहून पाहतो
तुला फितूर लेखणी दुखावते कधी कधी

तुझ्यापुढे मनातले म्हणूत,रोज वाटते
‘नकोच!’- मूठ झाकली बजावते कधी कधी !

अजूनही कधीतरी तसाच चंद्र वाहतो
पिऊन चांदणे निशा जडावते कधी कधी..

असे काही

21 02 2010

( http://www.manogat.com/node/19012 )

तुला पाहून झाले असे काही
स्पर्शून स्वप्न जावे- तसे काही

आज बोलून गेली असे काही
बोलणे संपवावे- तसे काही

चेहर्‍याची हवी ती छबी देती
चला शोधू असे आरसे काही…

मौन सोडी सखे एकदाचे हे
शब्द आणीन मी छानसे काही!

उद्या गावात होईल बोभाटा
तुझ्या गावीच नाही कसे काही ?

चढाओढीत ह्या जीवघेण्याही-
जिवाला जीव देती असे काही

कितीदा हाक देशील आयुष्या
तुला ठाऊक नाही जसे काही !

लवाद

15 11 2009

(कृपया हेही  पहावे :
http://www.manogat.com/node/18283 )

बाप-लेक आज पुन्हा कडाक्यानं भांडलेत-
टोकदार अपशब्द घरभर सांडलेत..
मी सारं ऐकतेय, पाहतेय
त्याच्या डोळ्यांतले अश्रू – धुमसणारे
आणि ह्यांचे अबोल हुंदके
फक्त मलाच ऐकू येणारे…
..
दोन वादळांमधल्या अस्वस्थ शांततेत
जीव मुठीत घेऊन वावरतेय,
त्या क्षणाला टाळत-
जेव्हा मला बनावं लागेल
त्या दोघांतला लवाद ,
ज्याला नसते
स्वतःची कुठलीच दाद- फिर्याद
..
त्या दोघांची वकील, साक्षीदार
माफीचाही –
मीच असणार आहे
कुणी जिंको वा हरो, शेवटी
मीच हरणार आहे….

कळावे कसे

04 11 2009

(  कृपया हे ही पाहावे :

http://www.manogat.com/node/18136

http://www.maayboli.com/node/11755  )

 

किती डोकवावे, कुणाच्या मनी हे कळावे कसे
कुणा आपले हो म्हणावे, कुणा प्रेम द्यावे कसे

तुझे हासणे भासते चांदणे चंद्रबिंबासवे
चकोरास थेंबातले तृप्त होणे, जमावे कसे

इथे हात नाहीत गोंजारणारे, कळ्यांचे सखे
फुला-रोपट्यांनी डुलावे, झुलावे खुलावे कसे

कुठे भेटली ती मला एकटीशी, म्हणावी तशी
जरी हासली गोड- जन्मास सार्‍या पुरावे कसे

जमावास बंदी कशी घातली पापण्यांनी तुझ्या
कधी लोचनांच्या तटी आसवांनी जमावे कसे

******************************

 

कसे तृप्त व्हावे, कधी आवरावे, सुटावे कसे
खरे हेच कोडे- ‘अता हे पुरे’ हे कळावे कसे

पुसा आसवे, ते निघालेच- देऊ शुभेच्छा,चला
विचारून पाहू इथे मागच्यांनी तरावे कसे

पहाटे दवाने भिजावे तसे लाजणे हे तुझे..
पहावे, तरी कोरडेही रहावे- जमावे कसे

विरक्ती हवी,शांतताही- तुम्हा मोह माया नको ?
अहो, संचिताने दिले दान ते आजमावे कसे ?

मला एकटा पाहुनी धाडले सोबतीला जसे
तुझ्या आठवांचे थवे लोटले- थोपवावे कसे

जरी ओळखीचेच आहेत सारे बहाणे तिचे-
नव्या रोज गोडीगुलाबीस नाही म्हणावे कसे !

*******************************